मुंबई : नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना आता अगोदरच मिळणं शक्य होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ सध्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळावी, यासाठी एक कार्यप्रणाली विकसित करत आहे.

चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना अगोदरच मिळाल्यास मोठी हानी टाळण्यास मदत होईल. माहिती अणू ऊर्जा आणि अंतराळ विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत लोकसभेत दिली.

इस्रोच्या उत्तर पूर्वी अंतराळ कार्यक्रम केंद्रामार्फत महापुराची पूर्वकल्पना मिळू शकेल. ही कार्यप्रणाली केंद्रीय जल आयोगाकडून वापरण्यात येत आहे. ब्रह्मपुत्रेला येणारा महापूर आणि त्यामुळे आसाममध्ये होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी इस्रोने पुराची पूर्वसूचना देणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.

कोणत्या भागात कधी अतिवृष्टी होईल किंवा ढगफुटीची शक्यता आहे का, याची पूर्वकल्पना देऊ शकणारी यंत्रणा हवामानशास्त्र विभागाच्या मदतीने वापरण्यात येत आहे.