बंगळुरु : पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी चांद्रयान -3 (Chandrayan 3) च्या लँडिंग पॉईंटला 'शिवशक्ती' नाव दिल्यानंतर इस्रोची (ISRO) प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर इस्रोने म्हटलं आहे की, "चांद्रयान -3 ज्या जागेवर लँड झालं त्या जागेचं नाव शिवशक्ती देणं हा समानतेचा देखील संदेश आहे." चांद्रयान मोहिम फत्ते झाल्यानंतर शनिवारी (26 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरुमध्ये जाऊन वैज्ञानिकांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधानांच्या भेटीमुळे इस्रोच्या शास्रज्ञांचा आनंद यावेळेस पाहायला मिळाला. शास्रज्ञांनी यावेळी म्हटलं की, 'पंतप्रधान मोदींचं भाषण हे भविष्यातील मोहिमा यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन देणारं आहे."
इस्रो प्रमुखांनी काय म्हटलं?
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटलं की, "पंतप्रधानांच्या येण्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या लँडिंगमुळे भारताने इतिहास रचला. यामुळे पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. त्याचं भाषण हे आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. तसेच या लँडिंग पॉईंटचं नाव 'शिवशक्ती' ठेवल्यामुळे देशभरातील महिलांचं योगदान देखील यामुळे लोकांना कळणार आहे."
पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. चांद्रयान-3 ज्या ठिकाणी लँड झालं ती जागा आता 'शिवशक्ती' या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच 2019 मध्ये चांद्रयान-2 ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या जागेचं नाव 'तिरंगा' ठेवण्यात आलं आहे. तसेच 23 ऑगस्ट हा दिवस आता 'राष्ट्रीय अवकाश दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे.
इस्रोच्या महिला शास्रज्ञांनी व्यक्त केला आनंद
इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ वृंदा व्ही यांनी म्हटलं की, "नारी शक्ती आणि इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण पंतप्रधान मोदी यांनी लँडिंग साईटला 'शिवशक्ती' असं नाव दिले आहे. ज्यामुळे देशभरातील महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे." इस्रोचे शास्त्रज्ञ मुथू सेल्वी म्हणाले की, "पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आपण आपण सशक्त आहोत, पण आपण देशातील इतर महिलांनाही सशक्त केले पाहिजे जेणेकरुन त्या त्यांची स्वप्ने पूर्ण करु शकतील."
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा परदेश दौरा आटोपून थेट इस्रो शास्रज्ञांच्या भेटीसाठी बंगळुरुला गेले. तिथे जाऊन त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक केलं. तसेच त्यांनी यावेळी चांद्रयान-3 ची दृश्य देखील पाहिली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयानाचे लँडिंग झाल्यानंतर इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्याशी फोनवरुन देखील संवाद साधला होता.