Israel Hamas War :

  इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गाझा येथील अल-अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात प्राण गमावलेल्यांसाठी शोक देखील व्यक्त केला. तसेच या संबंधाबाबत त्यांनी भारताची भूमिका देखील स्पष्ट केली. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत दिली आहे. 


यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधला. यावेळी मी गाझाच्या अल अहली रुग्णालयात नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मदत पाठवत राहू असं आश्वासन मी त्यांना दिलं. दहशतवाद, हिंसाचार आणि प्रदेशातील ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती यावर आम्ही चिंता व्यक्त केली आहे.' 


भारताच्या भूमिकेचा उल्लेख


पंतप्रधान मोदींनी यावेळी इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताच्या भूमिकेचा देखील उल्लेख केला. मागील काही वर्षांत भारत आणि इस्रायल यांच्यातील जवळीक वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.






हमासच्या हल्ल्यानंतर चर्चा


हमासच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासने केलेल्या घटनेला दहशतवादी घटना असा उल्लेख केला. 


पॅलेस्टाईन हा अरब देशातील एक प्रदेश आहे. या प्रदेशाला अद्याप देश म्हणून मान्यता मिळाली नाही.  पॅलेस्टाईनचे तीन भाग आहेत. पूर्व जेरुसलेम, गाझा पट्टी आणि वेस्टर्न बँक हे तीन क्षेत्र आहेत. अल-अक्सा कंपाऊंड पूर्व जेरुसलेममध्ये आहे आणि या कंपाऊंडची देखरेख जॉर्डनची जबाबदारी आहे, तर हे शहर इस्रायलच्या ताब्यात आहे. त्याचवेळी गाझा पट्टीमध्ये 23 लाख  पॅलेस्टिनी राहतात आणि हा भाग 2007 पासून हमासच्या प्रशासनाखाली आहे. पश्चिमेला पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनशी संबंधित अल फताह पक्षाचे सरकार आहे. पश्चिम किनाऱ्याची लोकसंख्या सुमारे 28 लाख आहे. तिन्ही भागांना मिळून पॅलेस्टाईन म्हणतात. या तिन्ही क्षेत्रांचे अध्यक्ष महमूद अब्बास आहेत.


हेही वाचा : 


Israel Palestine War : जेरूसलेममध्ये तिन्ही धर्माच्या पवित्र जागा, इजराइल आणि पॅलिस्टीन यांच्यातील युद्धाचं मूळ कारण