India Pak War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी भारत आणि पाकिस्तानकडून (Pakistan Army) सीमारेषेवर सैन्य आणि युद्धसामुग्रीची जमवाजमव सुरु झाली होती. अशातच तुर्कस्तानने पाकिस्तानला सहा विमानं भरुन दारुगोळा आणि अत्याधुनिक युद्धसामुग्री पाठवल्याची माहिती समोर आली होती. तुर्कस्तानने सी-130 या भल्यामोठ्या कार्गो विमानांमधून दारुगोळा घेऊन तुर्कस्तानची (Turkistan) सहा विमानं पाकिस्तानात उतरल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता तुर्कस्तानने या वृत्ताचा इन्कार केला आहे.
आम्ही पाकिस्तानला कोणतीही मदत केलेली नाही. तुर्कस्तानचे विमान फक्त इंधन भरण्यासाठी पाकिस्तानमध्ये उतरले होते. इंधन भरल्यानंतर विमानाने ठरवलेल्या मार्गाने प्रवास केला. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला दारुगोळा पुरवून मदत केल्याचे वृत्त खोटे असल्याचे तुर्कस्तानच्या संरक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार तुर्कीने दारुगोळ्याने भरलेली विमानं पाकच्या मदतीला पाठवली होती. तुर्की लष्कराच्या या कार्गो विमानांमध्ये मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा होता. तसेच तुर्कीने पाकिस्तानला बायरकतार ही धोकादायक ड्रोन्स दिल्याचीही चर्चा होती. मात्र, तुर्कस्तानाने या वृत्ताचा इन्कार केल्याने या सगळ्या चर्चांवर तुर्तास पडदा पडला आहे.
जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळं बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. जम्मू काश्मीरच्या विविध भागात दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या भागांमध्ये भारतीय लष्कराचा वावर वाढला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटनस्थळं तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच लष्करी कारवाई सुरू असलेल्या भागातली हॉटेलं, रिसॉर्टही बंद करण्यात आली आहेत.
बडगाम भागातली यूसमार्ग, तौसामैदान, दूधपाथरी ही पर्यटनस्थळे बंद असतील. गंदरबल भागातली कौसरनाग, करिवन दिवार, बंगूस व्हॅलीमध्ये पर्यटकांना जाता येणार नाही. बारामुल्ला जिल्ह्यातील वूलर तलाव, वाटलाबही पर्यटकांसाठी बंद राहील. उरी सेक्टरमधील कमान पोस्टला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, नंबलन धबधबा, इको पार्क खडियार, संगरवानही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच श्रीनगरलगतच्या अनेक भागात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
आणखी वाचा
पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली
कोकरनागच्या जंगलात भारतीय सैन्याला दहशतवादी दिसले पण, गोळ्याही झाडल्या, पण...