मुंबई : भारतानं पहिल्यांदा 2016 साली फ्रान्सशी राफेल विमानांसाठी करार केला. 2022 मध्ये 36 आधुनिक राफेल विमानं भारतीय सुरक्षा दलात सामील झाली. अवघ्या तीन वर्षात पुन्हा एकदा भारतानं आणखी 26 राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी आणि भारताचं सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी भारतानं फ्रान्सशी तब्बल 63 हजार कोटींचा हा करार केला. पण आताची राफेल विमानं आणि जुनी राफेल यात नेमका फरक काय? आताची राफेल मरीन विमानांची खास वैशिष्ट्य काय? राफेलसह स्वीडनमधून भारताला आणखी कोणतं अस्त्र मिळालंय? जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून...
आधी राफेल... आणि आता त्यापेक्षाही अॅडव्हान्स राफेल मरीन (Rafale Marine). सैन्य दलाची ताकद वाढवणारी आणि 26 राफेल विमानं भारताच्या ताफ्यात सामील होणार आहेत. भारतानं सोमवारी फ्रान्ससोबत अत्याधुनिक राफेल मरीन विमानांसाठीचा करार केला आणि पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिला.
शस्त्र खरेदीच्या बाबतीत भारतानं फ्रान्सशी केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जातोय. कारण या करारापोटी भारतानं मोजलेयत तब्बल 63 हजार कोटी रुपये.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दहशतवादाला पोसणारं पाकिस्तान हे भारताचं टार्गेट आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची एक बैठक झाली. आणि या बैठकीत राफेल एम विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली होती.
भारताकडे याआधी 36 राफेल विमानं होती. 2016 साली झालेल्या करारानंतर 2022 साली ही विमानं भारतात पोहोचली होती आणि आता नवी राफेल विमानं मिळून या खास अशा ब्रह्मास्त्रांची संख्या 62 होणार आहे.
राफेल मरीन विमानांची खास वैशिष्ट्य कोणती?
- राफेल मरीन नौदलाच्या विमानवाहून नौकांवर तैनात होऊ शकतात.
- हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा राफेल एम अधिक प्रगत.
- वजन - 15 हजार किलो
- रेंज - 3700 किमी.
- वेग - प्रति तास 2200 किमी
- इंधन क्षमता - 11 हजार किलो
- अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानानं सुसज्ज
- 50 हजार फूट उंचीवर उडण्याची क्षमता
- एका मिनिटात 18 हजार उंची गाठण्याची क्षमता
- हवेतच इंधन भरण्याची क्षमता
- 10 तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करण्याची यंत्रणा
- 9 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता
- अणुबॉम्ब डागण्याची क्षमता
- पाकिस्तानच्या एफ-16 आणि चीनच्या जे-20 पेक्षा अधिक प्रभावी
राफेल मरीनसह स्वीडननंही रॉकेट लॉन्चरच्या रुपात भारताच्या हाती एक मोठं शस्त्र दिलं आहे. ज्याचं नाव आहे कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर.
कार्ल गुस्टाफ रॉकेट लॉन्चरची वैशिष्ट्ये काय?
- रणगाडे, बंकर इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
- भारतासह 40 पेक्षा अधिक देशात कार्ल गुस्टाफ रॉकेट लाँचर. - लष्करातील सैनिकांसाठी उपयुक्त.
- नवीन M4 प्रकारात डिजिटल फायर कंट्रोल सिस्टम.
- नाईट व्हिजन, आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान .
- सहा ते सात किलो वजनाच्या लाँचरची रेंज 1 किलोमीटरपर्यंत.
- वजन कमी असल्यानं खांद्यावरून डागता येणारा शस्त्र प्रकार.
- रिकॉयललेस डिझाईन असल्यानं जास्त झटका न बसता फायरिंग.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना जमिनीत गा़डण्याचा विडा उचलला आहे. थारचं वाळवंट असो... किंवा अरबी समुद्र... किंवा मग सीमारेषेवर हवाई दलाचा सराव असो. भारतानं आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आता त्यात 63 हजार कोटींच्या राफेल करारानं पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असेल.
