मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरसला पहिला रुग्ण आढळला होता. कोझिकोड (Kozhikode) जिल्ह्यामध्ये निपाहच्या संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. आता निपाह व्हायरस संक्रमितांचं लोण 30 हून अधिक शहरांमध्ये पोहोचलं आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर जास्त असल्याने आरोग्य प्रशासनाच्या पुढे मोठं आव्हान आहे. निपाह व्हायरसमुळे सध्या आरोग्य प्रशासनासह केंद्र सरकारचीही चिंता वाढली आहे. निपाह व्हायरसचा मृत्यूदर 40 ते 70 टक्के आहे. हा मृत्यूदर कोरोना व्हायरसपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा मृत्यूदर फक्त एक-दोन टक्के होता. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
निपाह व्हायरसमुळे प्रशासनाची चिंता वाढली
केरळ राज्यातील निपाह संक्रमितांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. हे सर्व जण पहिल्या संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आता या 6 निपाहबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांवर आरोग्य प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपेक्षाही निपाह व्हायरस अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या संक्रमणापासून स्वत:चं संरक्षण करण्याचा सल्ला दिला जात आहे. निपाह व्हायरसमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा व्हायरस कोरोनाप्रमाणेच पसरतो का, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
निपाह व्हायरस किती धोकादायक?
भारतात पसरलेला निपाह व्हायरसचा स्ट्रेन अतिशय धोकादायक असल्याचं मानलं जात आहे. या स्ट्रेन बांगलादेशमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोझिकोड जिल्ह्यात रुग्ण आढळलेल्या प्रभावित क्षेत्रामध्ये न जाण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे. शिवाय लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
निपाह व्हायरसचे दोन स्ट्रेन
वैज्ञानिकांच्या मते, निपाह व्हायरसचे दोन स्ट्रेन आढळले आहेत. यामधील निपाहचा पहिला स्ट्रेन बांगलादेश येतील तर दुसरा स्ट्रेन मलेशियामधील आहे. बांगलादेशमधील निपाह व्हायरसचा स्ट्रेन धोकादायक असून यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे. तर, दुसरीकडे मलेशियाई निपाह व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये मृत्यूदर कमी आहे. बांगलादेशच्या स्ट्रेनचा प्रसार होण्याचा धोका जास्त तर मलेशियाच्या स्ट्रेनचा प्रसार होण्याचा धोका तुलनेनं कमी आहे.
एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्याला लागण होण्याचा धोका?
निपाह व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. निपाह व्हायरस कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याचं कारण म्हणजे यामध्ये मृत्यूदर जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, निपाह व्हायरसची एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहज लागण होऊ शकते. त्यामुळे यामध्ये विलगीकरणाची आवश्यकता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनाप्रमाणेच निपाह विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना थुंकीतून तसेच लघवी किंवा रक्त यातून निपाह विषाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नव्या निपाह बाधितांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते.