मुंबई : 'अफस्पा' कायद्याविरोधात उपोषणासाठी आयुष्याची 16 वर्ष वेचणारी मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या जुलैमध्ये मित्र डेजमन कॉटिनहोसोबत इरोम शर्मिलांचा विवाह होणार आहे. तामिळनाडूमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.


मणिपूरमधून अफस्पा कायदा हटवण्यासाठी परदेशी संस्थांची मदत घेणार आहेत. या कार्यात भावी पती डेजमन यांचीही शर्मिलांना साथ मिळणार आहे. डेजमन मूळचे आफ्रिकन असून त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. इरोम शर्मिला लग्नानंतर तमिळनाडूत स्थायिक होणार आहेत.

मणिपूरमधून अफस्पा कायदा हटवण्याच्या मागणीसाठी इरोम शर्मिलांनी 16 वर्ष उपोषण केलं होतं. अखेर गेल्या वर्षी 9 ऑगस्टला त्यांनी उपोषण सोडलं. त्यानंतरही समाजकार्याच्या ध्यासातून त्यांनी  'प्रजा' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

मणिपूर विधानसभा निवडणुकीत त्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांच्या पदरात अवघी 90 मतंच पडल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला, तरी इरोम आपलं समाजकार्य सुरुच ठेवणार आहेत.