नवी दिल्ली : आयआरसीटीसी आता प्रवाशांच्या मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांसाठीही विमा योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुरु केलेल्या विमा योजनेच्या यशानंतर रेल्वे प्रशासनाने हा विचार चालवला आहे. यासंबंधी आयआरसीटीसी आणि विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठकही झाली आहे. आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए के मनोचा यांनी ही माहिती दिली.


"विमा कंपन्यांनी खोट्या दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही काही पर्याय दिले आहेत आणि त्यावर विमा कंपन्यांची मतं मागितली आहेत. प्रवासी विम्यासोबतच आम्ही गॅझेट्ससाठी विमा सुरु करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचारही आम्ही सुरु केला आहे. सुरुवातीला ही विमा योजना क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्याच्या विचारात आहोत." असंही ते म्हणाले.

"रेल्वेतील चोरीच्या घटनांनाही विम्याचं कवच असावं अशी आमची योजना आहे. ज्यामुळे प्रवाशांना निर्धास्तपणे प्रवास करता येईल. पण विमा कंपन्यांनी फक्त अपघाताच्या घटनांना विमा संरक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागच्याच महिन्यात आम्ही प्रवासी विमा योजना सुरु केली आहे आणि याचा लाभ जवळपास 1 कोटी लोकांनी घेतला आहे." असंही मनोचा यांनी स्पष्ट केलं.