मुंबई: रेल्वेनं सर्व प्रकारच्या तिकीटांसाठी ऑनलाइन बुकिंगवरील सर्व्हिस फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचा आहे. 1 जूनपासून याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे.


 

भष्ट्राचाराला आळा बसावा यासाठी जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहारावर (कॅशलेस) मोदी सरकारकडून भर देण्यात येत आहे. ऑनलाइन व्यवहारात अनेकदा सर्व्हिस फी घेतली जाते. त्यामुळे बऱ्याचदा ग्राहकांची नाराजी पाहायला मिळते. पण आता रेल्वेनं सर्व प्रकारच्या तिकीटावरील (तात्काळ तिकीटावर देखील) सर्व्हिस फी माफ केली आहे.

 

याआधी ऑनलाइन तिकीट बुक केल्यास त्यावर अधिक सर्व्हिस फी द्यावी लागत होती. तिकीट बुकिंगसाठी डेबिट, क्रेडिट किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर केल्यास तिकीटाच्या किंमतीपेक्षा अधिक 30 रुपये भरावे लागत होते. मात्र, आता रेल्वेनं ही सर्व्हिस फी माफ केली आहे. बऱ्याचदा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन तिकीट बुकिंग केलं जातं.

 

कॅशलेस व्यवहारासाठी घेण्यात आलेला हा फारच महत्वाचा निर्णय आहे. अनेकदा ऑनलाइन तिकीटाची किंमत आणि तिकीट खिडकीवरील किंमत यामध्ये तफावत असते. त्यामुळे ऑनलाइन तिकीटासाठी पसंती दिली जात नाही. मात्र, आता या निर्णयामुळे दोन्हीकडे तिकीटांचे दर सारखे असणार आहेत.