कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सुभ्यातून म्हणजे पश्चिम बंगालमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. ठाकुरनगरमध्ये झालेल्या मोदींच्या या सभेत गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

पश्चिम बंगालच्या ठाकुरनगरमधील घटना भागात मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. पण सभेत गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान मोदींना आपलं भाषण अवघ्या 14 मिनिटांमध्येच संपवावं लागलं. या रॅलीतील दृष्य पाहून ममता दीदी हिंसेवर का उतरल्या हे लक्षात आल्याचा टोला मोदींनी यावेळी लगावला.

सभेत पोलिसांनीही ही गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांच्या गर्दीला आवर घालणं त्यांनाही कठीण झालं. मोदींच्या भाषणादरम्यान झालेल्या गर्दीत काही लोक जखमीही झाले. या जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांच्या उत्साहाला दाद दिली आणि झालेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, 19 जानेवारीला ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या संयुक्त भारत अभिय़ानात विविध 22 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सपा, बसपा, टीडीपी, डावे, नॅशनल कॉन्फरन्स यासह अनेक पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. विरोधकांच्या या एकजुटीनंतर आज मोदींच्या सभेला झालेली गर्दी ममता बॅनर्जी आणि विरोधकांसाठी एक इशारा असल्याची चर्चा आता रंगली आहे.