नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राजपथावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसले होते. कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि राहुल यांच्यामध्ये काहीतरी बोलणे सुरु होते. त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघांमध्ये कोणती राजकीय चर्चा झाली असेल, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. यावर गडकरी यांनी आज स्पष्टीकरण दिले.
नितीन गडकरी आज एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी केल्या जाणाऱ्या आसनव्यवस्थेत माझ्या शेजारची खुर्ची काँग्रेस अध्यक्षांची असते. त्यामुळे पूर्वी त्या खुर्चीवर (माझ्या शेजारी) सोनिया गांधी बसत होत्या. यावेळी राहुल गांधी बसले होते. समोरून अनेक चित्ररथ जात होते. आम्ही दोघे अधून-मधून एकमेकांशी या चित्रपरथांबद्दल बोलत होतो. जे लोक आमच्या एकत्र बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्यांनी मला सांगावं शेजारी न बसायला राहुल गांधी काय पाकिस्तानचे आहेत का? आणि आपण तर पाकिस्तानशीही चर्चा करतोच की', मग आम्ही शेजारी बसलो म्हणून काय फरक पडला.
माध्यमांमध्ये नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींनी केलेली काही विधाने ही सरकारविरोधी असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी पसरवल्या होत्या. तसेच गडकरींनी एक-दोन ठिकाणी माजी पंतप्रधान पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांचे जाहीर कौतुक केले होते. त्यावरुन गडकरी हे मोदी-शाह जोडीवर नाराज असून काँग्रेस नेत्यांचे कौतुक करत आहेत, अशा बातम्याही काही माध्यमांनी पसरवल्या. या सर्व गोष्टींवर नितीन गडकरी यांनी आज शिखर परिषदेत स्पष्टीकरण दिले.
माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्प्ष्टीकरण देताना गडकरी म्हणाले की, 'मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे मला पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही.' माध्यमं माझ्या बोलण्याचा अनेकदा चुकीचा अर्थ काढतात. मी जे काही बोलतो, माधमं त्यापैकी थोडाफार भाग कापून प्रसिद्ध करतात. त्यातून गैरअर्थ काढले जातात. त्यामुळे मी माध्यमांवर आणि माध्यमांच्या प्रतिनिंधींवर नाराज आहे. अनेकदा मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात येते.
संबधित बातमी : मला पंतप्रधानपदाचा लोभ नाही, गडकरींचं स्पष्टीकरण
शेजारी न बसायला राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का? गडकरींचा उद्विग्न सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2019 03:11 PM (IST)
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राजपथावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसले होते. कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि राहुल यांच्यामध्ये काहीतरी बोलणे सुरु होते. त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -