नवी दिल्ली : उद्या, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला हे दिग्गज उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. आज शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी दिल्लीला जात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले.







शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) मुंबईत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांच्याकडे शपथविधीच्या तयारीबाबत विचारणा केली. यावर राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करुन आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करु इच्छितो, असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर असे ठरले आहे की, विधानसभा अध्यक्ष हे काँग्रेसचे असतील तर विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे.