मुंबई : अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या बजेटची बॅग वायरल झाली आणि या बॅगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. 'बजेट' या शब्दातच या बजेटवाल्या बॅगचं गुपित दडलं आहे. बजेट हा शब्द ‘Bougette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो लेदर बॅग. ही प्रथा खर तर ब्रिटीशांची.
1860 मध्ये ब्रिटीश चान्सलर विल्यम ग्लॅडस्टोन यांनी ही प्रथा सुरु केली. ही पहिली बजेट बॅग ग्लॅडस्टोन बॉक्स म्हणून प्रसिद्ध आहे. बजेटसाठी हीच बॅग पुढच्या चान्सलरकडे हस्तांतरित करण्यात आली. पण ही बॅग खूप जुनाट झाल्याने 2011 मध्ये ही प्रथा ब्रिटनने बंद केली.
भारतात मात्र एकच बॅग पुढे हस्तांतरित करण्याची प्रथा नाही. त्यामुळे प्रत्येक अर्थमंत्र्याकडे नवा लुक असलेली बॅग दिसते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वात जास्त म्हणजे दहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
भारताचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी एक मजेशीर समारंभ होतो. ज्याला हलवा सेरेमनी म्हटलं जातं. या समारंभात अर्थमंत्री स्वत: हलवा तयार करुन सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना वाटतात. या समारंभानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी एका बंद खोलीत चर्चा करतात. तेव्हा कोणतेही मोबाईल किंवा इंटरनेटशी संबंधित कोणतंही यंत्र आत घेऊन जाण्यास मनाई असते.
यावर्षी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची अनुपस्थिती जाणवत होती.