बंगळुरु : भारतीय वायू सेनेचं मिराज 2000 हे प्रशिक्षक विमान शुक्रवारी बंगळुरुमधील हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वैमानिकांनी दुर्घटनेनंतर विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र विमानातील स्फोटानंतर लागलेल्या आगीत त्यांचा होळपळून मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांने दिली.


सुरक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मिराज 2000 हे प्रशिक्षक विमानाने अपग्रेड केल्यानंतर उड्डाण केलं होतं. मात्र काही वेळातच बंगळुरुच्या एचएएल विमानतळावर हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं.


स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ नेगी या वैमानिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत एक वैमानिक पूर्णपणे भाजल्याचा त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या एका वैमानिकाला सेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्या वैमानिकाचाही मृत्यू झाला.


एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. घटनास्थळी सर्वत्र धूर पसरला होता. काही वेळात पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि विमातळवरील कर्मचाऱ्यांनी काही वेळात विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर वैमानिकांना बाहेर काढण्यात आलं.