लखनौ : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील इस्लामिक शिक्षण संस्था दारुल उलूम देवबंदने जारी केलेल्या एका फतव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावणं हे इस्लामविरोधी असल्याचं या संस्थेने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील एका कुटुंबाच्या प्रश्नावर दारुल उलूमने हा फतवा जारी केला.

राज्यातील व्यावसायिक अब्दुल्ला माजिद यांनी दारुल उलूमला पत्र लिहिलं होतं, ज्यात विचारण्यात आलं, की दुकान किंवा अशा जागेवर सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाऊ शकतो का, जिथे लोकांचा वावर असतो? विभागातील तीन मौलानांनी सीसीटीव्ही लावणं इस्लामविरोधी असल्याचं सांगितलं.

घर आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करुन सीसीटीव्हीला पर्याय शोधला जाऊ शकतो. फोटो काढणं किंवा व्हिडीओ तयार करणं शरीयतमध्ये इस्लामविरोधी आहे. त्यामुळे मुस्लीम कुटुंब सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकत नाहीत, असा फतवाच दारुल उलूमने काढला.

दारुल उलूमने असे फतवे काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. बँकेत काम करणाऱ्या कुटुंबात लग्न करणं इस्लामविरोधी असल्याचंही या संस्थेने यापूर्वी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात लग्न करु नये, दारुल उलूमचा फतवा


सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद