बंगळुरु : देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक सदस्य आपले शेअर विकण्याचा विचार करत आहे. नारायण मूर्ती यांच्यासह या संस्थापकांच्या शेअरचा वाटा तब्बल 12.75 टक्के आहे. त्याची किंमत तब्बल 28 हजार कोटी रुपये आहे.
मात्र नारायण मूर्ती यांनी शेअर विकण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांची इन्फोसिसमध्ये 3.44 टक्के भागीदारी आहे.
तीन वर्षांपूर्वी प्रमोटरनी इन्फोसिस सोडल्यानंतर कंपनीचं व्यवस्थापन सुरळीत नसल्याने नाराजी पसरली होती. त्यामुळे संस्थापक हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. इन्फोसिस बोर्ड आणि मॅनेजरसोबतच्या संघर्षामुळे प्रमोटर यंदाच कंपनीतून पूर्णत: हात काढून घेण्याचा विचार करत आहे.
या प्रमोटर्सनी 1981 साली कंपनीची स्थापना केली होती. तर 1993 मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा मार्ग खुला केला.
संस्थापक व्यवस्थापन आणि बोर्डाच्या कामकाजावर खूश नाहीत. नारायण मूर्ती यांनी कॉर्पोरेट गव्हर्नंसवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी वरिष्ठ संचालकांना दिलेला गलेलठ्ठ पगारावर प्रश्न उपस्थित केले होते.
शेअर्सवर परिणाम
इन्फोसिसच्या सह-संस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबूलाल आणि के दिनेश यांच्याकडे कंपनीची कोणतीही जबाबदारी नाहीत. पण त्यांनी कंपनीशी संबंध तोडला तर इन्फोसिसच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो.