बंगळुरु : कामगार आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते कॅन्टीनचं उद्घाटन करण्यात आलं. या कॅन्टीनमध्ये फक्त पाच रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण मिळणार आहे.


येत्या काही महिन्यामध्ये कनार्टकात विधानसभेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या कॅन्टीनचा अभ्यास करून राज्यातील इतर शहरं आणि गावांमध्येही अशा पद्धतीच्या कॅन्टीन सुरू करण्याचा कर्नाटक सरकारचा मानस आहे. यातून कर्नाटकला भूकमुक्त करणार असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

नाश्ता आणि दिवस-रात्रीच्या जेवणासाठी 25 रुपये खर्च होतील. बंगळुरुत एकूण 198 कॅन्टीन उघडल्या जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 100 कॅन्टीन उघडल्या जातील, असे राहुल गांधी यांनी इंदिरा कॅन्टीनच्या उद्घाटनानंतर सांगितले.