मुंबई : भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगोने तब्बल 300 विमानांची ऑर्डर दिली. एअरबस कंपनीला विमान खरेदीची ही विक्रमी ऑर्डर दिली आहे. आतापर्यंत विमान कंपनीला मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगो कंपनीने 'ए 320 निओ फॅमिली' ची 300 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली. या ऑर्डरमध्ये ‘ए 320 निओ’, ‘ए 321 निओ’ आणि ‘ए 321 एक्सएलआर’ या विमानांच्या खरेदीचा ऑर्डरचा समावेश असणार आहे.

विमान खरेदीविषयी बोलताना इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्त म्हणाले, एअरबस कंपनीला कोणत्या एका एअरलाइनकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे, त्यामुळे ही ऑर्डर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकास करण्याची अपेक्षा आम्हाला आहे. आम्ही ग्राहकांना अजून स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची देखील नव्याने  आणणार आहोत.

यापूर्वी इंडिगोने 2005 ते 2015 च्या काळात तीन टप्प्यांमध्ये 530 एअरबस विमानांची ऑर्डर दिली होती. भारतातील हवाई क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता कंपनीकडून केली जाईल. हा तब्बल 33 अब्ज डॉलरचा (जवळपास 2.31 लाख कोटींचा) व्यवहार असू शकतो. याद्वारे शेअर बाजारातील आपले स्थान भक्कम करण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल.