श्रीहरिकोटा : इस्रोने तयार केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्पेस शटलचं आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आलं आहे. विमानासारखे पंख असलेलं आरएलव्ही-टीडी (RLV-TD) प्रक्षेपक पहिल्यांदाच इस्त्रोकडून अवकाशात सोडण्यात आलं आहे.
सतीश धवन स्पेस सेंटरमधून सकाळी 7 वाजता याचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर अभियान यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली. पुनर्प्रयोग करता येणाऱ्या रॉकेटच्या विकासाच्या दृष्टीने हे प्राथमिक मात्र महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतील, असं म्हटलं जातं.
पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करुन पृथ्वीवर परत येणे, हा या स्पेस शटलचा उद्देश आहे. हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आलं. या रॉकेटची लांबी 6.5 मीटर असून वजन 1.75 टन आहे.