नवी दिल्ली : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो बाईक अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाताना सुब्रतो पार्कजवळ सुप्रियो अपघातग्रस्त झाले.


 
बाबुल सुप्रियो यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याची माहिती त्यांच्या पीएने दिली आहे. सुप्रियो हे केंद्रात नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन राज्यमंत्री आहेत.

 
बाबुल सुप्रियो त्यांच्या मुलीला घेण्यासाठी विमानतळावर चालले होते. मुलीला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सुप्रियो यांनी स्वतःच बाईक चालवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते स्वतःची रॉयल एन्फिल्ड घेऊन निघाले.

 
ड्रायव्हर त्यांची गाडी बाईकमागोमाग घेऊन येत होता. बाईक चालवताना अचानक सुप्रियो यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मागून येणाऱ्या गाडीने जोराने ब्रेक दाबले, मात्र बाबुल सुप्रियो यांना थोडीशी धडक बसली.

 
बाबुल सुप्रियो यांच्या कोपराला दुखापत झाली असून त्यांच्या 'एम्स'मध्ये उपचार करण्यात आले.

 

https://twitter.com/SuPriyoBabul/status/728706420963573761

 

https://twitter.com/SuPriyoBabul/status/728707915993874432