नवी दिल्ली : जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. मूळचा केरळमधील असलेला संबंधित रुग्ण हा चीनमधल्या वुहान विद्यापीठातील विद्यार्थी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतातून झाली आहे.
दरम्यान कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 169 जण दगावले आहेत. या विषाणूच्या विळख्यात आता चीनमध्ये शिकणाऱ्या 27 भारतीय सापडले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. हे विद्यार्थी सीयानीगमधील हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. सात महाराष्ट्रीयन मुलांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतातून तब्बल 23 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकायला जातात, त्यातील 21 हजार वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत.
Corona Virus | चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातले!
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरु शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसची लक्षणे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
विषाणूचा प्रसार कुठून होऊ लागला?
कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून पसरु लागला आणि त्यानंतर याचे पीडित रुग्ण थायलंड, सिंगापूर, जपानमध्येही आढळून आले. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका कुटुंबाला या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं.
चीनमधून कसा पसरला व्हायरस?
चीनमधील 7711 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे तर इतर देशातील 70 लोकांना संसर्ग आहे. 1370 रुग्ण गंभीर आहेत तर 12, 167 संशयित रुग्ण आहेत. तब्बल 81 हजार 947 डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चीनमधून 17 देशात घातक विषाणू पसरला. 2002-200३ साली चीनमध्ये आलेल्या सार्स रोगापेक्षा कोरोना व्हायरस जास्त पसरला. सार्समुळे 700 बळी गेले होते. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतात झाली.
संबंधित बातम्या
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे 25 बळी, मुंबई-पुण्यात 5 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
अल्पावधीतच डझनहून अधिक देशांत 'कोरोना व्हायरस'ची लागण; मृतांची संख्या 100 वर
EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरस नेमका कसा पसरला? तुम्ही काळजी कशी घ्याल? बातमीच्या पलीकडे