नवी दिल्ली: UNEP, UNWTO,FEE,IUCN यांसारख्या आंतरराष्ट्रीय सदस्यांचा समावेश असलेल्या ज्युरीच्या गटाने एकाच वेळी भारतातील तब्बल आठ समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट दिले आहे. हा भारतासाठी खास अभिमानाचा क्षण आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. ही आठ ठिकाणे भारतातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील आहेत. शिवराजपूर (गुजरात ), घोघला ( दीव ), कासारगड आणि पादुबिद्री ( कर्नाटक ), कप्पड (केरळ ), ऋषिकोंडा ( आंध्र प्रदेश ), गोल्डन बीच ( ओडिशा ) आणि राधानगर ( अंदमान आणि निकोबार) या ठिकाणांचा यादीत समावेश आहे.
किनापट्टी भागातील प्रदूषण नियंत्रणासाठी या ज्युरीच्या गटाने भारताला तिसरे पारितोषिक बहाल केले आहे.
प्रकाश जावडेकरांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हंटले आहे की याआधी एकाच वेळी आठ किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट देऊन आतापर्यंत कोणत्याही देशाला गौरवण्यात आलेले नाही. हे लक्षात घेता भारताची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना मिळालेली ही 'जागतिक मान्यता' आहे असेही ते म्हणाले.





आशिया- पॅसिफिक प्रदेशातील भारत हा एकमेव देश आहे ज्याने केवळ दोन वर्षातच ही कामगिरी केली आहे असेही जावडेकर म्हणाले.
भारताचा आता 50 ब्लू फ्लॅग ठिकाणे असणाऱ्या गटात समावेश झाला असून येत्या पाच वर्षात भारताचा 100 ब्लू फ्लॅग ठिकाणांच्या गटात समावेश करण्यासाठी केंद्र सरकारचा मानस आहे.
भारताला एकूण 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. 2018 साली भारताने ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन साठी प्रयत्न सुरू केले होते. या मोहीमेचा भाग आणि लोकांत जागरुकता वाढावी म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी एक दिवस समुद्र किनाऱ्यावर जाऊन स्वच्छता केली होती. त्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.





भारतीय पर्यावरण खात्याने BEAMS ( Beach Environment & Aesthetics Management Services) हा किनारा सौंदर्य आणि व्यवस्थापनेसंबंधीचा कार्यक्रम आखला आहे. त्याचा उद्देश हा किनारी प्रदेशातील प्रदूषण कमी करणे, तिथे शाश्वत सोई-सुविधांचा विकास करणे, किनारी प्रदेशातील पर्यावरणाचे आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करणे आणि किनाऱ्यावरील स्वच्छता आणि आरोग्य टिकून राहण्यासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे किनारी प्रदेशातील पर्यटन वाढण्यास मदत होईल.


1498 साली वास्को द गामाने केरळ येथील कप्पड किनाऱ्यावरून भारतात प्रवेश केला होता असे म्हटले जाते. ओडिशातील गोल्डन बीच हा पुरी बीच या नावानेही ओळखला जातो. पुरी जगन्नाथ मंदिराला भेट देणारे पर्यटक या बीचला आवर्जून भेट देतात. आपल्या वाळू शिल्पकलेसाठी प्रसिध्द असलेले सुदर्शन पटनाईक हे याच किनाऱ्यावर आपली वाळु शिल्पकला साकारतात.


काय आहे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन?
जगातल्या स्वच्छ आणि सौंदर्याने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्क येथील द फाउंडेशन ऑफ एनव्हॉरमेंट एज्यूकेशन (FEE) या संस्थेकडून ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन दिले जाते. जगभरातील पर्यटकांना पर्यटन करताना कोणता समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर आहे याची माहिती मिळावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. एखाद्या किनाऱ्यारा असे सर्टिफिकेट मिळाले तर त्या ठिकाणचे पर्यटन वाढते असे लक्षात आले आहे. भारतालाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश या यादीत नाही.