नवी दिल्ली : भारताची लष्करी ताकद मोठी आहे. समुद्री सीमांवरही भारताची चोख नजर असते. भारतीय नौसेना (Indian Navy) विविध मोहिमा राबवत देशाच्या सागरी सीमांचं संरक्षण करते. त्यासोबत इतर देशांसोबत आपले संबंधही दृढ करते. भारतीय नौदल शत्रूला प्रत्युत्तर देण्यासोबतच मित्रत्व, या दोन्ही भूमिका चोखपणे पार पाडत आहे. भारतीय नौदलाने समुद्रात पाकिस्तानी व्यक्तीला वाचवल्याची माहिती समोर आली आहे. इराणी मासेमारी जहाजावरील व्यक्तीला वैद्यकीय मदत देत नौदलाने व्यक्तीचा जीव वाचवला आहे. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमेधाने संकटकाळात मदत करत मैत्रीची नवी व्याख्या दिली आहे.
भारतीय नौदला पाकिस्तानी व्यक्तीला दिलं जीवदान
युद्धनौका आयएनएस सुमेधाने इराणी मासेमारी जहाजावरील गंभीर पाकिस्तानी व्यक्तीचा जीव वाचवत माणुसकीचं दर्शन दिलं आहे. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने आपात्कालीन फोनला प्रतिसाद देत अल रहमानी या इराणी मासेमारी जहाजावरील पाकिस्तानी क्रू सदस्याला आपात्कालीन वैद्यकीय मदत दिली. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमेधा चाचेगिरीविरोधी कामासाठी तैनात असते.
इराणी मासेमारी जहाजाला केली मदत
भारतीय नौदलाने आपात्कालीन कॉलला तात्काळ प्रतिसाद दिला. इराणी मासेमारी जहाजावरील पाकिस्तानी क्रू सदस्याला गंभीर वैद्यकीय मदत दिली, असं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. भारतीय नौदलाच्या निवेदनानुसार, अरबी समुद्रात चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्ससाठी तैनात असलेल्या INS सुमेधा या युद्धनौकेने 30 एप्रिल रोजी इराणी मासेमारी नौकेला मदत दिली.
नेमकं काय घडलं?
INS सुमेधाने आपात्कालीन कॉलला त्वरी प्रतिसाद देत, 30 एप्रिल रोजी पहाटे FV अल रहमानीला जहाजावर पोहोचले. जहाजाची बोर्डिंग टीम आणि वैद्यकीय तज्ज्ञ FV अल रहमानीमध्ये चढले आणि क्रू मेंबरला वैद्यकीय मदत दिली. क्रू मेंबरला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. आयएनएस सुमेधा अरबी समुद्रामध्ये समुद्री चाचांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी तैनात आहे. INS सुमेधा युद्धनौकेने 20 पाकिस्तानी क्रू सदस्य असलेल्या इराणी जहावरील गंभीर रुग्णाला वैद्यकीय मदत दिली. याआधी त्या जहाजावरील एका क्रू मेंबर बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.