Kashmir Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, आता कुलगाम भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. एका गावात हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, यानंतर त्यांचा घेराव करून सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, शनिवारी रात्री एसएसपी कुलगाम यांना एका गावात लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी लपल्याची बातमी मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. काही तास चाललेल्या या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


कमांडर हैदरही ठार 


ठार झालेला हैदर हा पाकिस्तानी असून तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. त्याचा सुरक्षा दल बराच काळापासून शोधत होते. हैदरचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. या चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव शाहबाज शाह असल्याचे सांगण्यात आले आहे. जो काश्मीरचा रहिवासी होता. तत्पूर्वी कुलगाममध्येच काही दिवसांपूर्वी सतीश कुमार सिंग या नागरिकाची हत्या झाली होती. दहशतवाद्यांकडून एक AK-47, एक पिस्तूल, अनेक ग्रेनेड सापडले आहेत.


याबाबत माहिती देताना काश्मीर पोलिसांच्या आयजींनी सांगितले की, हैदर गेल्या दोन वर्षांपासून उत्तर काश्मीरमध्ये सक्रिय होता. तो बांदीपोरा येथून दहशतवादी योजना राबवत असे, मात्र अलीकडेच त्याने दक्षिण काश्मीरमध्ये आपले तळ बनवले होते. हैदरचा अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभाग होता. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या खात्माबाबत माहिती देताना आयजीपी म्हणाले की, या वर्षात आतापर्यंत एकूण 67 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी 16 इतर देशांतील होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीत सर्व्हे कमिटीला प्रवेश नाहीच, मशीद व्यवस्थापनाचा विरोध कायम; जाणून घ्या काय आहे वाद


Taj Mahal : ताजमहालमधील त्या 22 बंद खोल्या उघडाव्यात, भाजपच्या प्रवक्त्याची लखनौ खंडपीठात याचिका