Indian Railways:  रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता पुन्हा एकदा लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये अनारक्षित डब्यांची व्यवस्था सुरू होणार आहे. रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने गाड्यांमधील जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या गरीब, सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले की, सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे पूर्ववत करण्यात आल्या असून जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच जनरल तिकीट घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. यासोबतच आता प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 


कोरोना महासाथीनंतर रेल्वेने ट्रेनमधून अनारक्षित प्रवासाची सुविधा काढून घेतली होती. महासाथीच्या आजारापूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणेच आता प्रवाशांना द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी स्थानकावर जाऊन सामान्य तिकीट खरेदी करता येणार आहे.


जनरल तिकीट कधीपासून उपलब्ध होणार?


आगाऊ आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर प्रवाशांना सामान्य तिकिटांवर प्रवास करता येणार आहे. आगाऊ आरक्षण कालावधी 120 दिवस आहे. 'नियमित गाड्यांमधील सामान्य डबे अनारक्षित म्हणून पूर्वीप्रमाणे असणार आहेत. 


द्वितीय श्रेणीसाठी तिकीट आरक्षण


कोरोना महासाथीच्या काळात कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी करताना सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी ट्रेनमधून जनरल डब्यांची व्यवस्था रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून प्रवाशांना द्वितीय श्रेणीसाठीही आगाऊ आरक्षण करावे लागत होते. मात्र लवकरच अनारक्षित तिकिटांची विक्री झाल्यानंतर प्रवाशांना जनरल तिकीट खरेदी करून जनरल डब्यातून प्रवास करता येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha