नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मेपासून सुरू होणार आहे. 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याआधी 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा असून 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार होता. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान, सरकारने यावेळी देशांतील काही भागांत लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड झोन वळता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


देशात 130 रेड झोन असणारे जिल्हे आहेत. ऑरेंज झोनमध्ये 284 जिल्हे आहेत आणि ग्रीन झोनमध्ये 319 जिल्हे आहेत. ग्रीन झोनमध्ये मॉल, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. आता तुम्ही राहत असलेलं शहर कोणत्या झोनमध्ये येतं, हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.


देशात जोधपूर, कोटा, अजमेर, हैदराबाद, आगरा, लखनौ, नोएडा, वाराणसी, बुलंदशहर, मेरठ, मुजफ्फरनगर, मथुरा, हरिद्वार, कोलकाता, दिल्ली, पटना, गया, चंडीगढ, रायपूर, अहमदाबाद, सूरत, फरीदाबाद, श्रीनगर, रांची, इंदुर, उज्जैन, ग्वालियर, मुंबई, पुणे, नाशिक, जालंधर, पटियाला, लुधियाना आणि जयपूरसह एकूण 130 ठिकाणं देशातील रेड झोनमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांनुसार, आता जर जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपर्यंत एकही कोरोना बाधित आढळला नाही, तर ते ठिकाण ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात येईल. याआधी ही अवधी 28 दिवसांचा होता.


एएनआय वृत्तसंस्थेने देशातील झोनची संपूर्ण यादी दिली आहे



ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये सूट


ग्रीन झोनमध्ये 50 टक्के बस सुरू होणार आहेत. ऑरेंज झोनमध्ये ज्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्या कामांसाठी प्रवास करताना गाडीचा वापर करता येऊ शकतो. परंतु, त्यामध्ये एका ड्रायव्हर व्यतिरिक्त फक्त 2 प्रवासी प्रवास करू शकतात. ऑरेंज झोनमध्ये मोटरसायकलवर मागे बसण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.


लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये ई-कॉमर्सलाही सूट देण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला मंजूरी देण्यात आली आहे. या झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी ऑनलाईन मागवण्यासाठी सूट देण्यात आली आहे.


देशात सलग तिसरा लॉकडाऊन


कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.