नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देश 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या पुढे गेली आहे. तर, आतापर्यंत अकराशेहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस लॉकडाऊन करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.
देशात आणखी बऱ्याच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठवले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. या चर्चेतूनॉ मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन चालु राहणार आहे.
लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही : राज ठाकरे
देशात सलग तिसरा लॉकडाऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.