नवी दिल्ली : निवडणुकांच्या तोंडावर भाजप पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयानं जनतेला रामायण काळात घेऊन जाण्यासाठी नवीन टुरिस्ट ट्रेन 'श्री रामायण एक्स्प्रेस' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रामायणाचे संदर्भ असणाऱ्या ठिकाणांची सफर ही ट्रेन घडवणार आहे.


रामायणातील महत्वाच्या स्थळांना जोडणारी १६ दिवसांची ही यात्रा असणार आहे. दिल्लीहून 14 नोव्हेंबरला ही रेल्वे सेवा सुरु होणार आहे. त्यावेळी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निवडणुका ऐन भरात असतील, 2019चे बिगुल वाजायला सुरुवात झाली असेल, त्याचवेळी ही ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यानं राम नामाचा गजर सुरु झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


रामायण एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
- रामजन्मभूमी अयोध्या ते  श्रीलंकेपर्यंत 16 दिवसांचा हा प्रवास असेल.
- दिल्लीतून सुरुवात झाल्यानंतर नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग (अलाहाबाद), चित्रकूट, हंपी, नाशिक, रामेश्वरम या ठिकाणी ही ट्रेन थांबणार आहे.
- प्रत्येक व्यक्तीसाठी 15 हजार 600 रुपये तिकीट असणार आहे. या पॅकेजमध्ये खाण्यापिण्याची, निवासाची सोयही असेल. तर पर्यटन स्थळी फिरण्यासाठी काही इतर सेवा रेल्वे उपलब्ध करुन देणार आहे.
- ज्यांना श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित ठिकाणं पाहायची आहेत, त्यांना चेन्नईहून कोलंबोपर्यंत विमानानं प्रवास करावा लागेल. अर्थात या पुढच्या प्रवासासाठीचे पैसे स्वतंत्र भरावे लागणार आहेत.


निवडणुकीसाठी भाजपचा 'राम' जप
भाजपसाठी निवडणुका जिंकण्याचा 'राम' हा कायमचा प्रमुख मुद्दा आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी अडवाणींनी रथयात्रा काढली, त्यानंतर जे काही घडलं, त्यानं तर देशाचा इतिहास बदलला.


राममंदिराला पर्याय म्हणून अयोध्येतील रामायण सर्किट, सीतामढी ते जनकपूर बस सेवा, रामायण एक्सप्रेस अशा युक्त्या भाजपकडून शोधल्या जात आहेत.