Advance Train Ticket Booking: ट्रेन हे वाहतुकीचे सर्वात स्वस्त (Cheap) आणि प्रमुख साधन आहे, त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास (Railway Travel) करतात. अनेकदा रेल्वेत सीट मिळण्यावरुन देखील मारामारी होते, त्यातच ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आणि गाड्यांची संख्या अपुरी असेल तिथे परिस्थिती आणखी वाईट असते. लांबचा प्रवास करताना रेल्वेच्या नियमांची पुरेशी माहिती नसलेल्या लोकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या प्रवाशांना नियम (Railway Rules) माहित आहेत ते प्रवासापूर्वी तिकीट बुक (Advance Ticket Booking) करतात, जेणेकरून त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही आणि ते आरामात प्रवास करू शकतील.


रेल्वेचे नियम माहित असणं आवश्यक आहे


ट्रेनमध्ये प्रत्येक वर्गासाठी विशिष्ट भाडे आणि तिकीट बुक करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. अनेकदा लोक प्रवासापूर्वी तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. म्हणूनच ट्रेन सुटण्याच्या किती दिवस आधी तुम्ही तुमचं तिकीट बुक करू शकता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.


120 दिवस अगोदर करता येतं बुकिंग


रेल्वे प्रवाशांना अशी सुविधा देते, ज्यात ट्रेन ज्या तारखेला असेल त्याच्या चार महिने आधी प्रवासी आपले सीट्स आरक्षित करू शकतात. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधी तुमचे तिकीट बुक करू शकता. तसेच, तात्काळ तिकीट प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी बुक करता येते. 3 एसी आणि त्यापुढील श्रेणीसाठी दैनंदिन बुकिंग सकाळी 10 नंतर सुरू होते आणि स्लीपर तत्काळ बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते.


जनरल तिकिटासाठी नियम वेगळे


जनरल तिकिटासाठी दोन नियम आहेत. जर तुम्हाला ट्रेनच्या जनरल डब्यात 199 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्याच दिवशी तिकीट काढावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तिकीट काढल्यानंतर 3 तासांच्या आत प्रवास सुरू करायचा असतो. 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी तुम्ही 3 दिवस अगोदर जनरल तिकीट खरेदी करू शकता. आजच्या हायटेक युगात, आता तुम्ही घरच्या घरी आरामात भारतीय रेल्वेच्या अॅप्स आणि वेबसाइट्सद्वारे तिकीट काढू शकता, सीट्स आरक्षित करु शकता. रेल्वेच्या तिकिटांचं ऑनलाइन बुकींग आता सोपं झालं आहे.


हेही वाचा:


SSC Result: दहावीच्या निकालासंदर्भात महत्वाचं अपडेट; निकाल लवकरच, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता