रायपूर: रायपूर रेल्वे झोनमध्ये आज 'सुपर शेषनाग'चा मालवाहतूक प्रयोग यशस्वी झाला आहे. सुपर शेषनाग ही ट्रेन 2.8 किमी लांबीची असून त्यामध्ये एकूण चार गाड्यांचे एकत्रिकरण करण्यात आलं आहे. या गाडीमधून कोळशाचे वहन करण्यात आलं आहे. 


देशात अनेक ठिकाणी कोळशाची कमतरता निर्माण झाली असून त्यामुळे त्या ठिकाणी भारनियमनाच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. त्याच पार्श्वभूमीवर कोरबा, विलासपूर या ठिकाणाहून कोळसा भरुन सुपर शेषनाग ही 2.8 किमी लांबीची मालगाडी धावली. रायपूर मंडलच्या सिलयारी स्टेशनवरुन ही गाडी जात असताना एक व्हिडीओ काढण्यात आला आहे. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


 






कशी आहे सुपर शेषनाग गाडी?
सुपर शेषनाग ही तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि 251 डबे असलेली मालवाहतूक ट्रेन आहे. सुपर पायथन 'शेषनाग' असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. जुलै 2020 साली छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान या ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या. या गाडीला तब्बल 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन ) जोडण्यात आले आहेत.ज्यावेळी या गाडीची चाचणी घेण्यात आली होती त्यावेळी परमलकसा ते दुर्ग या दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण झाले होते. 


भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे. आजची कोळसा वाहतूक हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जातंय. 


वासुकी ही सर्वात मोठी ट्रेन
भारतात शेषनागपेक्षाही जास्त लांबीची ट्रेन असून वासुकी असं तिचं नाव आहे. ही ट्रेन 3.5 किमी अंतराची असून जानेवारी 2021 मध्ये तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर साधनसामग्री आणि तीही कमी वेळेत नेण्याची या ट्रेनमध्ये क्षमता आहे.