तब्बल 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन ) या खास ट्रेनला जोडण्यात आले होते. मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन काल दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सोडण्यात आली. ती 1 वाजून 5 मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करत ती चालवण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे.
परमलकसा आणि दुर्ग हे दोन्ही स्टेशन रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य झोनच्या नागपूर विभागात येत असले तरी छत्तीसगडमधील स्टेशन्स आहेत.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. तर या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.