India Rafale-M Deal : भारत सातत्याने आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे. भारताने (India) गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा भरणा केला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) सोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सैन्याची ताकद वाढवत आपले पाय भक्कम रोवताना दिसत आहे. आता भारत फ्रान्ससोबत राफेल-एम (Rafale-M) करार करणार आहे. भारत आयएनएस विक्रांतसाठी 26 राफेल समुद्री लढाऊ विमानं विकत घेणार आहे. लवकरच या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. 


भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 जुलै रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 14 जुलै, फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी 'बॅस्टिल डे' परेड समारंभात पंतप्रधान मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी 26 राफेल सागरी लढाऊ विमाने म्हणजेच राफेल एम खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या कराराची घोषणा करू शकतात. पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.


संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक


पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 13 जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत भारतीय नौदलासाठी 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. त्यामुळे सर्वांच्या नजरा डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलच्या (DAC) या बैठकीकडे लागल्या आहेत.


काय आहे राफेल-एम?


भारत फ्रान्सकडून 26 राफेल-एम (Rafale M) विमानं खरेदी करणार आहे. राफेल-एम ही समुद्री लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई दलात याआधी राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता. राफेल-एम राफेल लढाऊ विमानांच्या श्रेणीतील नौदल विमान आहे. राफेल-एम लढाऊ विमानाचं नाव राफेल मेरीटाइम असं आहे. फ्रेंच कंपनी डिसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) ने राफेल-एम विमानाची निर्मिती केली आहे. राफेल-एम विमानामध्ये राफेलपेक्षा 80 टक्के अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


राफेल-एम लढाऊ विमानामध्ये खास काय?


फ्रान्सची राफेल-एम लढाऊ विमाने समुद्रात पाळत ठेवण्यासाठी आणि लढण्यासाठी वापरली जातात. अमेरिकन फायटर हॉर्नेटपेक्षा हे विमान चांगलं आणि स्वस्त असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. राफेल-एम लढाऊ विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात करता येतील. 


राफेल-एम विमानाची वैशिष्टये


राफेल एम समुद्री लढाऊ विमानाची लांबी 15.27 मीटर, उंची 5.34 मीटर आणि वजन 10,600 किलो आहे. त्याची इंधन क्षमता 4700 किलोग्रॅम आहे. सर्वाधिक उंचीवर राफेल एम विमानाचा कमाल वेग 1912 किमी प्रतितास असतो, तर कमी उंचीवर त्याचा वेग ताशी 1390 किमी आहे. तीन ड्रॉप टाक्यांसह त्याची रेंज 3700 किमी आहे. हे विमान युद्धनौकेवर टेक ऑफ आणि लँड करू शकते.


यापूर्वी भारतात आलेली राफेल विमाने कोणती?  


भारताने याआधी फ्रान्सकडून राफेल विमानं खरेदी केली होती. सध्या भारतीय हवाई दलाकडे 36 राफेल विमाने आहेत. फ्रान्सकडून खरेदी केलेले राफेल लढाऊ विमानं 4.5 जनरेशनचे विमान जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे. याला राफेलला मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट असंही म्हणतात. राफेल लढाऊ विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करू शकतो.