Indian Navy : भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली. सोमालिया जवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व 15 भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्याशिवाय, भारतीय नौदलाने या जहाजातील सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका केली आहे. जहाजावर सर्व 21 जण हे क्रू कर्मचारी होते. भारतीय नौदलाच्या कंमांडोंनी समुद्री चाच्यांना पळवून लावले आहे. नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी ही कारवाई केली.
संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार अरबी समुद्रात समुद्री चाचेंविरोधात कारवाई करण्याचे निर्देश भारतीय युद्धनौकांना दिले आहेत. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने चार युद्ध नौका तैनात केल्या आहेत.
नौदलाने केली धडाकेबाज कारवाई
भारतीय नौदलाचे मरीन कमांडो शुक्रवारी (5 जानेवारी) लायबेरियन ध्वज असलेले व्यावसायिक जहाज एमव्ही लीला नॉरफोकवर उतरले आणि अपहरणकर्त्यांचा खात्मा केला. नौदलाच्या आयएनएस चेन्नईमधून कमांडो नॉरफोक जहाजाजवळ आले होते.
नौदलाने अपहरणानंतर एमव्ही लीला नॉरफोकचा शोध घेण्यासाठी सागरी गस्त विमान P-8I आणि लांब पल्ल्याच्या 'Predator MQ9B ड्रोन' तैनात केले होते.
जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील सर्व 15 भारतीय सुरक्षित आहेत. नौदलाच्या कमांडोंनी जहाजावर सर्च ऑपरेशन केले. जहाजावर आता अपहरणकर्ते नसल्याचे समोर आले आहे.
मार्कोस कमांडोंनी पार पाडली मोहीम
मार्कोस कमांडो हे समुद्रा चाच्यांवर अथवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष प्रशिक्षित केलेले असतात. मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल ट्रेन कमांडोज आहेत. त्यांना अशा खास मिशनसाठीच प्रशिक्षित केलं जातं.