खोल समुद्रात बोटीचा चेंदामेंदा, नौदल अधिकारी अभिलाष टॉमींची मृत्यूशी झुंज

अभिलाष टॉमी हे इतक्या लांब समुद्रात अडकले आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा किनारा ऑस्ट्रेलियाचा आहे. पर्थपासून जवळपास 3 हजार किमी अंतर आहे. तिथून अभिलाष टॉमींपर्यंत पोहोचण्यासाठी 5 दिवस लागतात.

Continues below advertisement
मुंबई: जगप्रसिद्ध आणि थरारक गोल्डन ग्लोब स्पर्धेत सहभागी झालेले, भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी हे स्पर्धेदरम्यान हिंदी महासागरातील वादळामुळे जबर जखमी झाले आहेत. वादळाने त्यांच्या बोटीचा चेंदामेंदा झाला आहे. त्यांची दुखापत इतकी गंभीर आहे की, त्यांना ना हात ना कंबरही हलवता येते. अशा परिस्थितीत ते खोल समुद्रात बोटीच्या तुकड्यांच्या आधारे तरंगत आहेत. त्यांनी स्ट्रेचरची मागणी केली आहे. गोल्डन ग्लोब रेसचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकाला 50 वर्षापूर्वीची बोट म्हणजे त्यामध्ये अत्याधुनिक काहीही नाही अशी बोट वापरावी लागते. केवळ संपर्क यंत्रणाच आधुनिक आहे. शिडाच्या बोटीने 42 हजार 280 किमीची विश्वभ्रमंती एकट्यानेच करायची असते. अभिलाष टॉमी हे इतक्या लांब समुद्रात अडकले आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा किनारा ऑस्ट्रेलियाचा आहे. पर्थपासून जवळपास 3 हजार किमी अंतर आहे. तिथून अभिलाष टॉमींपर्यंत पोहोचण्यासाठी 5 दिवस लागतात.
वादळ आणि तब्बल 14 मीटर उंच लाटा तसंच 130 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अभिलाष यांच्या बोटीचा चक्काचूर झाला. वाऱ्याच्या वेगाने बोट तुटल्यामुळे अभिलाष टॉमी जखमी झाले. अभिलाष टॉमी यांच्याशी सॅटेलाईटद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. भारतीय नौदल बचावकार्यात मग्न आहे. शिवाय अन्य देशही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. अभिलाष टॉमी यांच्याजवळच्या इमर्जन्सी किटमध्ये वीएचएफ रेडिओ आहे. मात्र त्यांच्या कमरेला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना हलताही येत नाही. अभिलाष यांच्या बचावासाठी नौदलाने आयएनएस सातपुडा आणि चेतक हेलिकॉप्टर पाठवलं आहे.
अभिलाष टॉमी हे  कीर्तीचक्र विजेते आहेत. 2013 मध्ये त्यांनी जगप्रदक्षिणा केली होती. सध्या ते  स्वदेशी बनावटीची बोट एस व्ही थुरियाच्या आधारे भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. फ्रान्समधील स्पर्धेच्या आयोजकांनी अभिलाष टॉमी यांच्याशी संपर्क साधला आहे.  सध्या ऑस्ट्रेलियन बोटी अभिलाष टॉमी यांच्या बचावासाठी रवाना झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने जी बोट पाठवली आहे, त्यामध्ये एक डॉक्टर आणि आवश्यक यंत्रांचं रुग्णालय आहे.  एक रॉयल ऑस्ट्रेलियन नेवी बोटही तिकडे जाणार आहे, जी चार-पाच दिवसात पोहचू शकेल. गोल्डन ग्लोब रेस अभिलाष टॉमी हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. गोल्डन ग्लोब रेस ही जगातील थरारक नौकानयन स्पर्धा आहे. ही स्पर्धा फ्रान्समधून 1 जुलैला सुरु झाली होती. समुद्रातील खराब हवामानामुळे त्यांचं शिडाचं जहाज उलटलं.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola