मनमाड : अनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा जणांशी लग्न करुन त्यांना गंडवणाऱ्या महिलेचा प्रताप नाशकात समोर आला आहे.

नाशकात नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये राहणारा राजेंद्र चव्हाण. राजेंद्रने नातेवाईकांच्या माध्यमातून सोलापुरातील 'ओम हवा मल्लिकानाथ वधू-वर सूचक केंद्रा'त नाव नोंदवलं. मुलगी पसंत पडल्यावर राजेंद्र 9 मे 2018 च्या मुहूर्तावर तिच्याशी विवाहबंधनात अडकला.

लग्नाच्या वेळी राजेंद्रने 'नववधू'ला 85 हजार रुपये, तर विवाह जमवून देणाऱ्या संस्थेला 5 हजार 551 रुपये दिले. लग्नानंतर पहिल्यांदाच जेव्हा नवरी माहेरी गेली, तेव्हा तिच्या काका-काकूंनी 'आमच्या मुलीला अंगावर दागिने का नाही घातले?' असा प्रश्न विचारत राजेंद्रला त्रास दिला.

माहेरी राहून पुन्हा काही दिवसांनी ती सासरी आली. सोलापूरहून फोन आला की ती एकांतात जाऊन बोलत असल्यामुळे राजेंद्रला संशय आला. त्याने तिचा मोबाईल तपासला असता, तिला आधीच्या नवऱ्याचे फोन येत असल्याचं उघड झालं.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने नांदगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी आणि एका महिलेसह वधू-वर सूचक मंडळ चालवणाऱ्याला अटक केली.

या महिलेने यापूर्वी नऊ जणांशी विवाह केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. राजेंद्रसोबत दहावं लग्न केल्यानंतरही ती अकरावं लग्न करण्याच्या तयारीत होती. मात्र राजेंद्रच्या सतर्कतेमुळे ती गजाआड झाली.