नवी दिल्ली : पाकिस्तानात घुसून भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर वायुसेना, भूदल आणि नौदल या भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पाकिस्तानच्या एफ 16 विमानाने डागलेल्या 'अम्राम मिसाईल'चे तुकडे सादर करण्यात आले. हे तुकडे भारतात एलओसीजवळ सापडले होते. बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे आपल्या हाती असून पुरावे सादर कधी करायचे हे सरकार ठरवेल, असं तिन्ही दलांनी स्पष्ट केलं. भारतीय सैन्य पाकिस्तानची कोणतीही आगळीक सहन करणार नाही, असं तिन्ही दलांच्या वतीने ठणकावून सांगण्यात आलं.


एअर वाईस मार्शल आर जी जे कपूर, मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल, रिअर अॅडमिरल डी एस गुंजाल यांनी तिन्ही दलाच्या वतीने पत्रकार परिषदेला संबोधित केलं.

VIDEO | भारताच्या तिन्ही सैन्य दलाची संयुक्त पत्रकार परिषद | नवी दिल्ली | एबीपी माझा



पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

पाकिस्तानी विमानांचा ताफा भारताच्या वायुसीमेत पाहिल्याची माहिती वायुसेनेने दिली. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.

पाकिस्तानच्या बॉम्बहल्ल्यात भारतात कोणतंही नुकसान नाही. भारताची दोन विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा धादांत खोटा असल्याचंही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.

भारताचं मिग 21 विमान क्रॅश झालं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उद्या मायदेशी परतणार आहेत.

गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक

भारतीय वायुसेनेने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं. त्याचे पुरावेही आपल्याकडून असून लवकरच ते सादर केले जातील. मात्र किती दहशतवाद्यांचा खात्मा केला, हे इतक्यात सांगता येणार नाही

आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. 26 फेब्रुवारीला पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं, त्याला सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन दिवसात पाकिस्तानकडून 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले

पाकिस्तानचं एफ 16 विमान भारताने पाडलं. या विमानातून डागलेल्या एअर टू एअर 'AMRAAM मिसाईल'चे तुकडे भारतात एलओसीजवळ सापडले होते, हे तुकडे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले.

अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान देताना केवळ दहशतवादाविरोधात वापरण्याची अट घातली होती. मात्र एफ 16 विमान वापरल्याचा नाकारणारा पाकिस्तान तोंडावर पडल्याचं पुन्हा समोर आलं आहे.


पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा



 पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली. त्यामुळे अभिनंदन उद्या भारतात परतणार आहेत. अभिनंदन वर्धमान यांची दोन दिवसांनी सुटका होणार आहे.