नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बाबा रामदेव यांनी 15 दिवसात माफी मागितली नाही तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा आता आयएमएनं योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात हे वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर त्यांनी अॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला 25 प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असा सवाल विचारला होता. अॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.
Baba Ramdev Withdraws Comments: 'आम्ही अॅलोपॅथी विरोधी नाहीत, मी वक्तव्य मागे घेतो', बाबा रामदेव यांचं आरोग्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर
बाबा रामदेव यांचं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र
बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
'आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केला, वक्तव्य मागे घ्या', मंत्री हर्ष वर्धन यांचं रामदेवबाबांना पत्र
बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांचं पत्र
बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी रामदेव बाबांना त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घ्या. तुमच्या स्पष्टीकरणातून पूर्ण समाधान होत नाही. तुम्ही हे आपत्तीजनक वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल ही आशा आहे. कोरोना काळात डॉक्टरांबाबत असं वक्तव्य करणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देवी, पोलिओ, इबोला, टीबी या सारख्या गंभीर आजारांवर अॅलोपॅथीक पद्धतीनेच मात झाल्याची आठवण देखील हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबांना करुन दिली होती. मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं की, आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालं आहे. आपण जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याने वेदना शमणार नाहीत, असं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं.