नवी दिल्ली : योगगुरु रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर  बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी रामदेव बाबांना त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घ्या.  तुमच्या स्पष्टीकरणातून पूर्ण समाधान होत नाही.  तुम्ही हे आपत्तीजनक वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल ही आशा आहे. कोरोना काळात डॉक्टरांबाबत असं वक्तव्य करणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देवी, पोलिओ, इबोला, टीबी या सारख्या गंभीर आजारांवर अ‍ॅलोपॅथीक पद्धतीनेच मात झाल्याची आठवण देखील हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबांना करुन दिली आहे. 






मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालं आहे. आपण जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याने वेदना शमणार नाहीत, असं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. 


लाखो करोना रुग्णांचा मृत्यू अ‍ॅलोपॅथी औषधं घेतल्याने झाल्याचं आपलं वक्तव्य चुकीचं आहे. आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करत आहेत. ते दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहेत, असं डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. 


पत्रात मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, आशा आहे की आपण या विषयावर गंभीरतेने विचार कराल आणि कोरोना योद्धांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल.