ठाणे : ठाण्याच्या सिग्नल शाळेतील मुलांना थेट इस्रोला भेट द्यायची संधी मिळणार आहे. जगण्याची भ्रांत असलेल्या मुलांच्या या प्रेरक प्रवासाने या परिसरात आनंदाची लहर आली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिग्नल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावला. यामुळे त्यांना आता थेट पाच दिवस इस्रो पहायची संधी देण्यात आली आहे. नेमकी ही सिग्नल शाळेतील मुलं या शाळेत नेमकी शिक्षण कशी घेतात? आणि या खडतर परिस्थितीतून त्यांनी नेमका असा कोणता प्रयोग सादर केला? याची सध्या चर्चा आणि या मुलांचे कौतुक होताना दिसत आहे.


ठाण्यातील तीन हात नाकावर असलेल्या सिग्नल शाळेतील किरण काळे आणि अतुल पवार हे विद्यार्थी जे आता अनेकांचा स्वप्न असलेली थेट इस्रोवारी करणार आहेत. डोंबिवलीमध्ये भरलेल्या विद्यान प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. दुष्काळी भागातून आल्यामुळे पाण्यासंबंधी काहीतरी प्रयोग सादर करावा त्यांच्या डोक्यात आलं आणि शिक्षकांच्या सहकार्याने त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठीचा प्रयोग तयार केला.

काय आहे ही सिग्नल शाळा
जे मुलं सिग्नलवर काम करतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशासाठी ही सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. त्यात अतुल पवारसारखा विद्यार्थी रात्री सिग्नलवर लाईट खाली अभ्यास करत जिद्दीने आपलं स्वप्न पूर्ण करतोय. आपण कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं, अशा इस्रोमध्ये त्याला पाच दिवस राहायला मिळणार आहे.

13 ते 17 एप्रिल दरम्यान हे विद्यार्थी इस्रोला भेट देऊन त्याठिकाणी चालणाऱ्या कामाची माहिती घेणार आहेत. सिग्नलवर काम करत थेट आपण सादर केलेला प्रयोग आपल्याला इस्रो दर्शन घडवू शकतो हे माहीत झाल्यावर घरच्यांना सुद्धा आपल्या पोरांवर विश्वास बसत नाहीये. मात्र, कठीण परिस्थितीवर मात करत शालेय वयात या प्रकारच्या नव्या संकल्पना सत्यात उतविणारे हे विद्यार्थी इतरांसाठी एक वेगळी शिकवण देऊन जात आहेत.

मेहनत जिद्द, चिकाटी याच्या बळावर आज या सिग्नल शाळेच्या मुलांनी हा प्रयोग सादर करून थेट इस्रो गाठलं आहे. इस्रो वारी अनेकांसाठी स्वप्नवत असते मात्र हेच स्वप्न या दोघांनी सत्यात उतरवून इतरांसाठी एक उदाहरण समोर आणलं आहे. यामुळं या दोघांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.