Independence day 2022 : सोलापूरच्या चादरीनं देशाच्या नकाशात सोलापूरची ओळख निर्माण करून दिली असली तरी देशाच्या स्वातंत्र्याला सोलापूरची एक वेगळी झालर आहे. सोलापूरचा इतिहास कुणी सांगू लागलं की, ओघानं ती झालर सगळ्यांना आठवते. कदाचित आताच्या पिढीला त्याची माहिती नाही किंवा जुनी माणसं असतील तर, ती विस्मरणातही गेली असेल. 15 ऑगस्ट दिनी मात्र ती स्वातंत्र्याची झालर सोलापूरच्या इतिहासात पुन्हा डोकावते आणि सोलापूरकरांचा ऊर अभिमानानं भरुन येतो आणि अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात मग 'भारत माता की जय'चे नारे गुंजू लागतात, तिरंगा डौलानं आकाशात मिरवू लागतो. त्याच स्वातंत्र्याच्या पानातील सुवर्णक्षरांनी कोरलेला हा एक इतिहास.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचा इतिहास रोमांचकारी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूर हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक होते, आता त्याचा मोठा विस्तार झाला आहे. यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक घटनेचे पडसाद येथे उमटत असत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक घटनेला सोलापुरकरांचा हात लागला ते या कारणामुळेच आणि रेल्वे मार्गामुळेच. रेल्वे आली की कोणती ना कोणती घटना येथे समजायची आणि त्याचे बरेवाईट पडसाद जिल्ह्यात उमटत असत.
स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणारा जिल्हा
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटीशांच्या जोखडाखालून स्वतंत्र झाला, मात्र या स्वातंत्र्याआधीची गोष्ट सोलापुरात घडली आहे. सारा देश 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला असला तरी सोलापूर मात्र 1930 मध्येच स्वतंत्र झाले होते. बरोबर 17 वर्षे आधी म्हणजेच 9, 10 आणि 11 मे रोजी सोलापुरातून इंग्रज अधिकार्यांना हाकलून देऊन स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यात आला होता. 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर महानगरपालिकेवरील इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून भारताचा ध्वज अभिमानाने फडकविला होता.
संतांच्या या भूमीने इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले असल्याची नोंदही इतिहासात सापडते. 5 मे 1930 रोजीच्या मध्यरात्री महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली. या घटनेची दखल घेवून जिल्ह्यात मोठे जनआंदोलन छेडण्यात आले. जनतेने मोर्चे काढले, देशभक्तीपर गाणी म्हणून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
सोलापूरकरांच्या भावनांचा उद्रेक
गांधींजीना अटक केल्याच्या घटनेचा सोलापुरात इतका परिणाम झाला की, स्वातंत्र्याच्या चळवळीत एक माणूस मागे राहिला नाही. श्रीनिवास काडगावकर यांनी गांधीजींच्या अटकेची बातमी सार्या गावाला सांगितली. ‘पकडे गये गांधीजी, अब तो निंद छोडो’ असे गीत म्हणून लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा अंगार पेटता ठेवला. या घटनेमुळे ब्रिटीशांविषयी सोलापुरकरांच्या मनात अधिक असंतोष निर्माण झाला. काँग्रेस नेते रामकृष्ण जाजू यांनी टिळक चौकात 6 मे रोजी जाहीर सभा घेऊन ब्रिटीशांच्या अरेरावीपणाची भूमिका मांडली. जाजू यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले मात्र, लोकांच्या भावना तीव्र होऊन सोलापूरकरांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि तोच उद्रेक संपातून प्रकट झाला. गिरणी कामगारांनी संप पुकारून बंदचे आंदोलन छेडले. यातून पोलीस आणि गिरणी कामगार यांच्यात चकमकी झाल्या. याचा परिणाम म्हणून मद्रास मेल आडवण्यात आली आणि दारुची दुकानंही उद्ववस्त करण्यात आली.
सोलापुराच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिला हुतात्मा
8 मे 1930 रोजी ब्रिटीशांनी बजाज आणि नरिमन यांना अटक केली. त्याकाळी नरिमन युवकांचा लाडका नेता होता. आपल्या लाडक्या नेत्याला अटक झाली म्हटल्यावर जनतेतून तीव्र असंतोष उफाळून आला. आपल्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांनी नरिमन यांच्या छायाचित्रांची मिरवणूक काढली. याचवेळी काही युवक शहरातील रुपा भवानी भागात शिंदीची झाडे पाडण्यासाठी गेले होते. ही माहिती ब्रिटीश पोलीस निरीक्षक नॅपेट, कलेक्टर हेन्री नाईट आणि पोलीस अधीक्षक प्लेफेअर यांना कळताच ते तिथे हजर झाले. झाडे तोडण्यास पोलिसांनी विरोध केला, मात्र पोलिसांच्या वाटा दगड, झाडे टाकून आडवण्यात आल्या होत्या, तरीही पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतले. ही बातमी वार्यासारखी सोलापुरात पसरली आणि जमावाने त्यांना सोडण्याची मागणी केली, ब्रिटीशांनी मागणी मान्य न केल्याने जमाव संतप्त झाला. यावेळी त्या काळचे लोकनेते मल्लप्पा धनशेट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही शांततेच्या मार्गाने नऊ जणांना सोडून देण्याची मागणी केली मात्र, पोलिसांनी ती मागणी फेटाळली. त्यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला, अशातच शंकर शिवदारे नावाचा 21 वर्षाचा युवक भारताचा ध्वज घेऊन कलेक्टरच्या दिशेने घोषणा देत धावला, त्याच क्षणी कलेक्टरने निदयीपणे त्याच्यावर गोळी झाडली आणि त्यात तो गतप्राण झाला. हाच तरुण शिवदारे मग सोलापुराच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिला हुतात्मा ठरला. हुतात्मा ठरलेल्या शिवदारे याचा मृत्यू म्हणजेही ब्रिटीशांच्या चळवळीविरोधातील एक ठिणगी होती.
बदल्याच्या वणवा पेटला
जमावाच्या मध्यभागी उभा राहून कलेक्टरने शिवदारेवर गोळी झाडली, लोकं संतप्त झाली. मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी कलेक्टरचा जीव वाचवला. जमावाला एकट्याच्या बळावर पांगवून कलेक्टरची सुटका केली. सुटका केल्या केल्या कलेक्टरने पुन्हा निदयीपणे जमावावर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले. या घटनेचा इतका वाईट परिणाम झाला की, जमावाकडून जाळपोळ करण्यात आाली. मंगळवार पेठ पोलीस चौकी पेटवून देण्यात आली. पोलीस चौकीतील कागदपत्रं जाळण्यात आली, पोलीस हवालदाराला जाळून मारण्यात आले. संतप्त जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर, त्यांनी न्यायालयाची इमारतही बघता बघता जाळून बेचिराक करून टाकली. जमाव हाताबाहेर जात असल्याचे ब्रिटीशांच्या लक्षात येताच, आपणही या वणव्यात बळी जायला वेळ लागणार नाही असं लक्षात येताच ब्रिटीशांच्या दोन अधिकार्यांनी सोलापूरमधून पळ काढला.
इंग्रज अधिकार्यांच्या मनात सोलापुरविषयी धडकी
ब्रिटीश अधिकार्यांनी जीवाच्या भीतीने पळ काढला, पण जमाव शांत होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी सोलापुरात जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही मग अंदाधुंद गोळीबार केला. ब्रिटीशांच्या गोळीबारात वीस ते तीस जणांचे जीव गेले. इंग्रजांच्या या कृत्याचा परिणाम म्हणजे इंग्रज अधिकार्यांच्या मनात सोलापुरविषयी धडकी भरली आणि ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या सोलापुरात पुढचे तीन दिवस म्हणजेच 9, 10 आणि 11 मे 1930 रोजी एकही अधिकारी फिरकला नाही. सोलापुरातील हे तीन दिवस म्हणजे स्वातंत्र्याची नांदी होती आणि तेच स्वातंत्र्य सोलापूरने या तीन दिवशी उपभोगले होते.
पर्यायी सरकार स्थापन
स्वातंत्र्याच्या या तीन दिवसांच्या कालावधीत येथे पर्यायी सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकार कायम व्हावे असे अभिप्रेत होते, मात्र, हे पर्यायी सरकार ब्रिटीशांनी मोडीत काढले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लष्करी कायदा पुकारला जाण्याचा तो एकमेव प्रसंग होता. पंडित नेहरू त्यामुळे सोलापूरला ‘शोला’पूर असे म्हणत असत.
चार देशभक्तांना फासावर लटकवले
पोलिसांनी जमावावर केलेला अंधाधुद गोळीबार म्हणजे जालियानवाला बागेची छोटी आवृत्ती म्हणून सोलापुरातील ‘मार्शल लॉ’कडे पाहिले जाते. यात मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि श्रीकिशन सारडा या चार देशभक्तांना फासावर लटकवण्यात आले. 12 जानेवारी 1931 रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात या चारही देशभक्तांना फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता ते कारागृहातील जागेतच दफन करण्यात आले. चारही देशभक्तांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असते तर त्यांची मोठी अंत्ययात्रा निघाली असती व त्यातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात जनतेतील असंतोष पुन्हा उग्र झाला असता. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी बिकट झाला असता, याचा विचार करून चारही हुतात्म्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता येरवडा कारागृहातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आजही तो दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.