नवी दिल्ली : घुसखोरांना मदत करण्याऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने 9 मे रोजी चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. याबाबतची माहिती काल भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सैन्याने नौशेरामधील कारवाईचा व्हिडीओदेखील जारी केला आहे. पण आता या घटनेचा पूंछमधील कृष्णा खोऱ्यातील भारतीय सैनिकांच्या मृतदेहाच्या विटंबनेशी जोडला जात आहे.


भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाच्या विटंबनेचा वचपा काढल्याची चर्चा आहे. कारण 1 मे रोजी पूंछमधील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने दोन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.

त्याचा राग भारतीय सैन्यासोबत सर्वच भारतीयांमध्ये होता. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावना कोट्यवधी भारतीयांनी व्यक्त केली होती. त्यानुसार भारतीय सैन्य दलाने 9 मे रोजी नौशेरामधील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे, भारतीय सैन्याने नौशेरामधील ज्या भागात सर्जिक स्ट्राईकचा पार्ट-2 केला. त्याच भागात 28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याने पहिले सर्जिक स्ट्राईक केले होते. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या हद्दीतील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. याच भागातून पुन्हा घुसखोरी होत असताना, भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

1 मे रोजी पूंछमधील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने भारतीय सीमेत घुसखोरी करुन नायाब सुबेदार परमजीत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर या दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. तसेच त्यांचे शिर कापून नेलं होतं.

कृष्णा खोऱ्यातील या घटनेचा भारतीय सैन्याने आठ दिवसातच वचपा काढला आहे. काल भारतीय सैन्याने जारी केलेल्या व्हिडीओत, 9 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाक सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या.

रॉकेट लॉन्चर, अँटी टँक गायडेड मिसाईल, 106 रिकॉल गन आणि ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चरच्या सहाय्याने भारतीय सैन्याने ही कारवाई केली.

नौशेरा भागातील पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमध्ये पाक रेंजर्सनी बंकर उभारले आहेत. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास मदत व्हावी, यासाठी या बंकरमधून पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग केलं जातं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 17 एप्रिल रोजी नौशेराच्या याच पोस्टवरुन शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार झाला होता.

संबंधित बातम्या

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार