मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम ओपिनिअन पोलमध्ये भाजपाला दोन राज्यांमध्ये सत्ता टिकवता येण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. तर काँग्रेसच्या हाताला एक राज्य साथ देण्याची शक्यता आहे. 'एबीपी न्यूज' आणि लोकनीती सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणात या शक्यता समोर आल्या आहेत.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार तर राजस्थान मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतरांची परंपरा राखत काँग्रेसकडे जाणार आहे, अशी चिन्हं ओपिनिअन पोलमधून दिसत आहेत.

मध्य प्रदेशात कांटे की टक्कर

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यात भाजपला 41 टक्के मतांसह 116 जागा, काँग्रेसला 40 टक्के मतांसह 105 जागा तर इतर पक्षांना 19 टक्के मतांसह नऊ जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूजच्या ओपिनिअन पोलमध्ये व्यक्त झाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवराज सिंह यांना 37 टक्के जनतेने पसंती दिली आहे, तर ज्योतिरादित्य सिंधिया यांना 24 टक्के आणि कमलनाथ यांना 10 टक्के जनतेने ओपिनिअन पोलमध्ये मत दिलं आहे.

छत्तीसगडमध्ये बहुमताची चिन्हं

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. भाजप 56 जागा, काँग्रेस 25 जागा, तर अजित जोगी यांचा जनता काँग्रेस पक्ष मायावतींच्या साथीने नऊ जागा मिळवण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रमणसिंह यांना 40 टक्के, तर अजित जोगी यांना 20 टक्के जनतेने कौल दिला आहे. भूपेश बघेल यांच्या बाजूने केवळ 14 टक्के जनता आहे.

राजस्थानात भाजपला दे धक्का?

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. हे राज्य मात्र भाजपला धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. तिथे काँग्रेस 45 टक्के मतांसह 110 जागा, भाजप 41 टक्के मतांसह 84 जागा तर इतरांना 14 टक्के मतांसह फक्त सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये  मुख्यमंत्रिपदासाठी मात्र वसुंधरा राजे यांना 32 टक्के जनतेची मतं आहेत. दुसरीकडे, गहलोत यांना 26 टक्के, तर पायलट यांना 14 जनतेने कौल दिला आहे.

नरेंद्र मोदींची लोकप्रियता

मध्य प्रदेश- 39%
छत्तीसगड- 48 %
राजस्थान- 52%

राहुल गांधींची लोकप्रियता

मध्य प्रदेश- 33%
छत्तीसगड- 28 %
राजस्थान- 18%