Jammu and Kashmir : काश्मिरी मुलींना सक्षम करण्यासाठी भारतीय लष्कराकडून (Indian Army ) बारामुल्लामधील बोनियार येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.  ख्वाब-ए-ताबीर प्रकल्पांतर्गत काश्मिरी मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 


काश्मिरी मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी लष्कराने संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध योजना हाती घेतल्या आहेत. 300 हून अधिक मुलींना सक्षम बनवण्याचे या प्रकल्पाचे लक्ष्य असून  अनेक मुलींचे प्रशिक्षण देखील यशस्वीपणे पूर्ण केले आहे. 


ख्वाब-ए-ताबीर हा प्रकल्प उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील बोनियार तहसील अंतर्गत येणाऱ्या भागातील मुलींसाठी सुरू करण्यात आला आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प त्यांच्यासाठी आशेचा किरण आणि प्रेरणा ठरणार आहे.  ख्वाब-ए-ताबीर हा एक पथदर्शी प्रकल्प असून याची संकल्पना भारतीय सैन्याची असून मेक माय ट्रिप अँड फ्लो क्लाउड टेक्नॉलॉजी (NGO) च्या सहकार्याने तो सुरू करण्यात आला आहे.  


कौशल्य विकास केंद्राच्या प्रशिक्षक मेहरीन जान म्हणाल्या, “सध्या 20 ते  30 मुली माझ्या देखरेखीखाली काम करतात आणि मी त्यांना फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंगचे  शिकवते. अनेक अशिक्षित, तसेच सुशिक्षित मुली येथे प्रशिक्षणासाठी येतात. त्यांचे प्रशिक्षण सुरू होऊन चार ते पाच महिने झाले असून सध्या सर्वच मुली चांगल्या प्रकारे काम करत आहेत.  


“माझा ठाम विश्वास आहे की मुलींनी स्वतंत्र असले पाहिजे. येथे फारशा नोकऱ्या नसून आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु  या प्रकल्पांतर्गत  काश्मिरी  मुलींना रोजगार उपलब्ध होईल., असे मेहरीन जान यांनी सांगितले. 


हा प्रकल्प खेड्यातील मुली आणि महिलांना सक्षम करण्यासाठी राबवण्यात आला असून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षकांच्या हाताखाली टेलरिंगसह विविध कामांचे प्रशिक्षण देण्यात येते. 


“मी तीन महिन्यांपूर्वी प्रशिक्षणाला सुरूवात झाली. भारतीय सैन्याच्या प्रयत्नाने मुलींना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी कौशल्य विकास केंद्रात येऊन प्रशिक्षण घेऊ लागले. या प्रकल्पामुळे मला रोजगाराचे साधन मिळाले असून मी आता माझ्या घरी स्वतंत्रपणे काम करू शकते, अशी माहिती  प्रशिक्षणार्थी सायमा बानो हिने दिले.