नवी दिल्ली: एकेकाळी भारतीय लष्करामध्ये तोफांची कमतरता भासत होती, आता तोच देश जगातल्या इतर देशांसाठी तोफांची निर्यात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतातील खासगी कंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सकडून (Kalyani Strategic Systems) 155 मिलियन डॉलर्स म्हणजे 1261 कोटी रुपये किमतीच्या तोफा निर्यात करण्यात येणार आहेत. पण या तोफा कोणत्या देशांना निर्यात केल्या जाणार आहेत याचा खुलासा मात्र करण्यात आला नाही. 


पुण्यातील कल्याणी उद्योग समूहाने (Kalyani Group Bharat Forge) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सला एका नॉन कॉन्फ्लिक्ट झोनकडून (non-conflict zone) 155 एमएम आर्टिलरी गन्सची ऑर्डर मिळाल्याचं सांगितलं आहे. कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सला मिळालेल्या तोफांची ही ऑर्डर येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची किंमत 1261 कोटी रुपये इतकी आहे. 


सौदी अरबकडून ही ऑर्डर?


नॉन क्लॉान्फ्लिक्ट झोन म्हणजे असा प्रदेश की ज्या ठिकाणी कोणतंही युद्ध किंवा वाद सुरू नाही. पण हा देश म्हणजे सौदी अरब असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. कारण दोन वर्षांपूर्वी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स कंपनीकडून सौदी अरबमध्ये दोन तोफा ट्रायलसाठी पाठवण्यात आल्या होत्या. 


सौदी अरबने भारत फोर्जच्या भारत 52, 155 मिमी, 52 कॅलिबर टोव्ड हॉवित्झरच्या चाचण्या केल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2020 मध्ये सौदी अरबच्या सैन्याने या तोफेची चाचणी घेतली होती. ही कंपनीने तयार केलेली पहिली तोफ होती. या तोफेची मारक क्षमता सुमारे 41 किलोमीटरची आहे आणि 50 सेकंदात यातून सहा राउंड फायर केले जाऊ शकतात.


पुण्यातील कल्याणी समुहाकडे 155 मिमीच्या तोफांचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) भागीदारीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीची अ‍ॅडव्हान्स्ड टॉवेड आर्टिलरी गन (Advanced Towed Artillery Gun- ATAGS) याचा समावेश आहे.


भारतीय तोफांची ही दुसरी ऑर्डर


भारत फोर्जला मिळालेली ऑर्डर ही भारताच्या तोफांच्या निर्यातीसाठीची दुसरी ऑर्डर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताला आर्मेनियाकडून पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट सिस्टमची ऑर्डर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट या रुटच्या माध्यमातून मिळाली होती.


ही बातमीही वाचा: