जैसेलमेर : भारतीय लष्कराचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. हवाई दलाच्या मिग-21 या विमानाचा राजस्थानमधील जैसलमेरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात  पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हांचा (Harshit Sinha) मृत्यू झाला आहे. जैसेलमेर पोलिसांनी या घटनेची पृष्टी दिली आहे. 


जैसेलमेर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितलं की, सॅम ठाणा परिसरातील डेझर्ट नॅशनल पार्कच्या जवळ या विमानाचा अपघात झाला. आता या घटनेवर भारतीय हवाई दलाने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. भारतीय हवाई दलाने एक ट्वीट करत सांगितलं की, साडे आठ वाजता भारतीय हवाई दलाच्या मिग-21 या विमानाचा पश्चिम सेक्टरजवळ अपघात झाला आहे. या अपघाताच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


 










भारतीय हवाई दलाने मिग-21 हे विमान 1960 च्या दशकात त्यांच्या ताफ्यात सामिल करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये मिग-21 विमानांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. जून 2019 मध्ये संरक्षण मंत्र्यांनी संसदेत एक निवेदन सादर करताना सांगितलं होतं की 2016 पासून एकूण 24 मिग-21 विमानांचा अपघात झाला आहे. सध्याचा विचार करता भारतीय हवाई दलात मिग-21 विमानांचे सहा स्क्वॉड्रन आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये 18 विमानं असतात. 


या आधी तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी भारतीय लष्कराचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :