CDS Bipin Rawat : हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले होते. तर, ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रविवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात बिपीन रावत यांचा रेकॉर्डेड व्हिडीओ मेसेज जारी करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले होते. 


दिल्लीतील कार्यक्रमात दाखवण्यात आलेला हा व्हिडीओ हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी (Helicopter Crash)  एक दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडीओत बिपीन रावत यांनी 1971 युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर साजरा करण्यात येणाऱ्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त बिपीन रावत यांनी सशस्त्र दलाला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. 


 






सुवर्ण महोत्सव साधेपणानं होणार -
भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या 1971 च्या युद्धाला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहे. या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम साधेपणाने होणार आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली. स्वर्णिम विजय दिन 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, इंडिया गेट येथे भारत-पाकिस्तान युद्धाच्या 'स्वर्णिम विजय वर्षा'च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला विजय पर्व साजरा करण्यास एकत्रित आलो आहोत. हा दिवस भारतीय लष्कराच्या संस्मरणीय विजयासाठी आहे. भारतीय सैन्याने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला.