14 फेब्रुवारी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायुदलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात जैशचे 350 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
27 फेब्रुवारी 2019 या दिवशी एरियल एंगेजमेंट दरम्यान दोन विमानं कोसळली होती, यात कुठलीच शंका नाही, असं एअर वाईस मार्शल आरजीके कपूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यापैकी एक लढाऊ विमान भारतीय वायुदलाचे मिग-21 बायसन होते, तर दुसरे पाकिस्तान एअरफोर्सचे एफ-16 हे लढाऊ विमान होते. पाकिस्तानला दिलेले कोणतेही एफ-16 नावाचे विमान भारताने पाडलं नसल्याचा दावा अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी केला होता. परंतु भारतीय वायुसेनेने आज पुराव्यानिशी हा दावा खोटा ठरवला आहे.
पाकिस्तानी विमानांनी 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. पाकिस्तानी एअरफोर्सच्या एफ-16 या लढाऊ विमानाने भारतीय सीमेत घुसून सैनिकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. यानंतर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं आणि त्यावेळी त्यांचं विमानही दुर्घटनाग्रस्त झालं.