नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अगदी 3 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पाचपट व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंतिम निकाल लागण्यास थोडासा उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट स्लिप (पावती) पडताळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मतमोजणीवेळी अपेक्षेपेक्षा पाचपट अधिक वेळ लागणार असल्याने लोकसभेचा अंतिम निकाल हाती येण्यासाठी किमान दीड ते दोन दिवसांचा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅट पावत्या मोजण्यासाठी विशिष्ठ पद्धत वापरली जाते. त्यानुसार एका विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली जाते. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये बदल केला आहे. नव्या बदलानुसार एका विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. कोर्टाने सुचवलेले नवे बदल लवकरच अंमलात आणले जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाकडून 4 हजार 125 व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली जात होती. व्हीव्हीपॅटची संख्या पाचपट केली जाणार असल्याने आता निवडणूक आयोगाला 20 हजार 625 व्हीव्हीपॅट मशीन्सची मोजणी करावी लागणार आहे.