जोधपूर: भारतीय वायुसेनेचे मिग-27 युपीजी हे लढाऊ विमान राजस्थानमधील जोधपूरजवल कोसळले. दुर्घटनेदरम्यान वैमानिकाला कोणतीही इजा पोहोचली नाही. नेहमीप्रमाणे सरावासाठी निघालेल्या मिग-27 विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात हे विमान कोसळले. जोधपूरच्या सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील गोडाना गावात ही घटना घडली.

मिग-27 युपीजी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात आलं. बिघाड ध्यानी आला असता त्याने, मी 11:45 वाजता गोडाना, शिवगंजजवळ सिरोही गावात 120 किमीच्या वेगाने असल्याची माहिती वायुदलाला दिली. यानंतर काहीच क्षणात विमान कोसळले, वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा बचाव केला.

दुर्घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान न झाल्याचं दिसून आलं. भारतीय वायुदलाचा याक्षेत्रातील हा नववा अपघात आहे. जानेवारीपासून भारताने जॅग्वार फायटर-बॉम्बर, दोन मिग-27 युपीजी, दोन हॉक-फायटर, दोन सूर्यकिरण लढाऊ विमानांची तुकडी, मिग-21 बायसन अशी अनेक लढाऊ विमानं गमावली आहेत.