नवी दिल्ली : सैनिकांना दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेजबहादूर यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. युद्धभूमीवरुन आता तेजबहादूर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय तेजबहादूर यांनी घेतला आहे. मी वाराणसी येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचं तेजबहादूर यांनी म्हटलं आहे.


मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून मला निलंबित करण्यात आलं. त्यामुळे सैन्य दलातील भ्रष्टाचार संपवणे आणि सैन्यदल मजबूत करणे हे माझं ध्येय असल्याचं तेजबहादूर यांनी सांगितलं.



जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असताना तेजबहादूर यांनी 2017 मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. आम्ही सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो. मात्र आमच्या जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.


अनेकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावं लागत, असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जवानांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबद्दल व्हिडीओद्वारे तेजबहादूर यांनी तक्रार केली होती. त्यानंतर बेशिस्तीच्या आरोपाखाली त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.